पिंपरी – रात्रीच्या वेळी बंद दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकाम साईटवर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वाकड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन, टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) पहाटे तीन वाजताच्या सुमारास थेरगाव डी मार्ट जवळ करण्यात आली.
शाम हरी गाढवे (वय 21, रा. निगडी), अतिश भारत सिरसाट (वय 19, रा. चिंचवड), नवनाथ दिगंबर साठे (वय 35, रा. थेरगाव), शुभम सिद्राम कांबळे (वय 19, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार करणसिंग उर्फ कल्ल्या चरणसिंग टाक (वय 19, रा. पिंपरी) हा पळून गेला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस गुरुवारी मध्यरात्री वाकड, थेरगाव परिसरात गस्त घालत असताना थेरगाव येथील डी मार्ट जवळ काहीजण संशयितरीत्या थांबले असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना पकडले. त्यांचा पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
आरोपींकडून पोलिसांनी तीन कोयते, मिरची पावडर, मोबाइल फोन, तीनचाकी टेम्पो, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे चौकशी केली असता ते वाकड परिसरात बंद असलेली दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून दरोडा घालणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने आरोपींना 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी अतिश शिरसाठ याच्यावर वाकड, पिंपरी, चिंचवड पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. शाम गाढवे याच्यावर तळेगाव दाभाडे, सांगवी, चिंचवड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. करणसिंग टाक याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.