खालापूर– जन्माचे गाव नाही, घराचा पत्ता नाही, आधार नाही, रहिवाशी नाही, शिक्षणाचा गंध नसलेल्या डोंबारी समाजाची व्यथा जराशी निराळी आहे. ‘उद्याच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरू दगड उशाला, गाळुणी घाम आता मागू या भाकरी, नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी’ या ओळी डोंबारी समाजाच्या जीवनाचे वास्तव दाखवितात. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही जगण्यासाठी सुरू असलेली गरीबाची धडपड आहे. देश एकीकडे हजारो मैल दूर चंद्रावर, मंगळावर जात असताना डोंबाऱ्यांच्या मुलांना मात्र हातात काठी पकडून काही फूट उंचीवर असलेल्या दोरीच्या एका टोकावरून दुसऱ्या टाकावर तोल संभाळत कवायतीचे प्रकार करुन दाखवावे लागत आहेत आणि जीवन जगावे लागत आहे. डोंबारी समाजातील लहान मुलांना चालता बोलता येऊ लागते, तेव्हापासून वेगवेगळी प्रात्यक्षिके करायला लावतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे या समाजातील कुटुंबीयांच्या व्यथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत. डोंबारी समाजाची अद्याप म्हणावी तशी प्रगती झालेली नसून शासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे पाच ते दहा वर्षाच्या कोवळ्या जीवांना जीवघेण्या कसरती करायला लावून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याचे चित्र खोपोली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात दिसून आले. शिक्षण, विकास आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेला हा डोंबारी समाज रस्त्याच्या कडेला तसेच बाजार पेठांमध्ये पारंपारिक डोंबारी कला सादर करतो. नाच व खेळ याचा सुरेख संगम साधत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर कला सादर करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत आहेत. उद्याची चिंता न करता घाम गाळून कला दाखवित लोकांचे मनोरंजन करून त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून भाकरीचा चंद्र त्यांच्या ताटात दिसतो. तेव्हा त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसुन येते. डोंबारीचा खेळ पाहायला ना कुणाला वेळ… दुर्मिळ झालेला डोंबारीचा हा खेळ पाहण्याकडे सध्या कुणाकडेच वेळ नसल्याने डोंबारी समाजाचा मुळ उपजीविकेचा व्यवसाय अडचणीत आला आहे. पूर्वी गावोगावी डोंबारी समाज आपल्या कसरतीचे खेळ करीत, या खेळातून त्यांना गावखेड्यात चांगले पैसे मिळत होते. या पैशावर डोंबारी समाजाच्या कुटुंबाची उपजीविका चांगली चालत होती. परंतु, काळाच्या ओघात माणूस गतिमान झाल्याने कुणाकडेही डोंबाऱ्याचा खेळ पाहण्यासाठी वेळ नसल्याचे दिसत आहे.