प्रभात वृत्तसेवा पुणे : काहीही झाले तरी महापालिका निवडणूक लढवायचीच, असा चंग बांधलेल्या इच्छुकांनी गेल्या तीन दिवसांत तब्बल ९ हजार १०१ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रत्येक जागेसाठी सरासरी ५५ अर्जांची विक्री झाली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात अर्ज विक्री झाली असून अर्ज देताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. महापालिका निवडणुका चार सदस्यांच्या प्रभागात होणार असून ४१ प्रभागांतून १६५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये स्थापन केली आहेत. येथे अर्ज विक्री आणि स्वीकृती होत आहे.पालिकेच्या माहितीनुसार २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ६४३७ अर्जांची विक्री जाली. शुक्रवारी ( २६ डिसेंबर) आणखी २६६४ अर्जांची विक्री झाली असून, आतापर्यंत एकूण ९१०१ अर्जांची विक्री झाली आहे. सर्वाधिक अर्जांची विक्री कोथरूड-बावधन तर सर्वात कमी विक्री कसबा विश्रामबागवाडा कार्यालयात झाली. आठ अर्ज दाखल निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची ३० डिसेंबर ही अंतिम मुदत असून शुक्रवार अखेर ८ अर्ज भरले आहेत. बिबवेवाडी कार्यालयात ३, वारजे कर्वेनगरला २, कै. बा. स. ढोले पाटील रोड, नगर रोड-वडगाव शेरीला, कोथरूड-बावधनला प्रत्येकी अर्जाचा समावेश आहे.