अजितदादांच्या वादळातही विजयाचा झेंडा! ८५ वर्षांचे चंद्रराव तावरे आहेत तरी कोण?

Chandrarao Taware : गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे २१ पैकी २० जागा निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही पॅनलचा सुपडा साफ करण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत.
केवळ एका जागेवर त्यांच्या वाटेला पराभव आला. ही निवडणूक अनेक मुद्यांनी गाजली. पण अजित पवार हे स्वतः आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उतरल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. प्रतिस्पर्थी असलेल्या तावरे बंधूंचे सहकार बचाव पॅनलला फक्त एक जागा जिंकता आली आहे, सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
सहकारमहर्षी म्हणून चंद्रराव तावरे यांना ओळखले जाते. या निवडणुकीच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या सातत्याने वयाचा उल्लेख केला होता, ८५ वर्षांचे झालात, आता तरी थांबणार आहात की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यामुळे आता चंद्रराव तावरे नक्की आहेत तरी कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
कोण आहेत चंद्रराव तावरे?
चंद्रराव तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील २०२५ ची माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’च्या माध्यमातून लढविण्यात आली. या पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार सांगवी गटातून निवडून आले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या टीममध्ये चंद्रराव तावरे होते. त्यांनी वसंतदादांना नेहमी आदरस्थानी मानले. वय झाले तरी काही विचार मूल्य सोबत घेऊन लढत रहायचा हा त्यांचा स्थायीभाव आहे. चंद्रराव तावरे यांचे सर्व पॅनेल जवळपास पराभूत झाले. मात्र, लोकांनी चंद्रराव तावरे यांना स्वीकारले.
अजितदादांच्या पॅनेलचे तगडे आव्हान समोर असतानाही चंद्रराव अण्णांनी त्या वादळातही विजय संपादन केला. 2019 मध्ये चंद्रराव तावरे आणि त्यांचे सहकारी रंजन तावरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक सहकारी क्षेत्रातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली.
22 जून रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी तब्बल ३५ तास चालली. सर्वांच्या नजरा या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत स्वतःला चेअरमनपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा : हिमाचलमध्ये ढगफुटीने हाहाकार ! अचानक आलेल्या पुरात दोन जणांचा मृत्यू ; २० जण गेले वाहून





