नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयातशुल्क लावल्यानंतर पर्यायी बाजारपेठात निर्यात वाढविण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत 27 सदस्य युरोपियन युनियनला निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यापैकी स्पेन, जर्मनी, बेल्जियम, पोलंड या देशांना निर्यात वाढत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यातल्या त्यात स्पेनला निर्यात जास्त प्रमाणात वाढत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. एप्रिल- नोव्हेंबर या कालावधीत स्पेनला झालेली निर्यात 56 टक्क्यांनी वाढून 4.7 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत स्पेनला तीन अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. त्यामुळे आता भारताच्या एकूण निर्यातीत स्पेनचा वाटा 0.5% वरून 2.4% वर गेला. या कालावधीत जर्मनीला झालेली निर्यात 9.3 टक्क्यांनी वाढून 6.8 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधी येथे ही निर्यात 7.5 अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले की, भारताच्या एकूण निर्यातीत जर्मनीचा वाटा 0.2% वरून आता 2.6 टक्क्यावर गेला आहे. जर्मनी भारताचा परंपरागत आयातदार देश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बेल्जियमला होणारी निर्यात गेल्या वर्षाच्या 4.2 अब्ज डॉलरवरून 4.4 अब्ज डॉलरवर गेली आहे. पोलंडला होणारी निर्यात या कालावधीत 7.6 टक्क्यांनी वाढून 1.82 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ 1.69 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले की, आकडेवारीवरून हे दिसून येते की, युरोपीय समुदायातील केवळ एका देशाला निर्यात वाढत नाही तर सर्वच देशांना निर्यात वाढत आहे. आगामी काळामध्ये या निर्यातीत वाढ झाल्यानंतर भारताला निर्यातीसाठी मोठा आधार मिळू शकणार आहे.