आग वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला
बारामती (प्रतिनिधी) : शहरातील भिगवण रोड लगत असलेल्या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बारामती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळेत येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात असलेल्या झाडांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. हे चित्र पाहून कार्यालयीन अधिक्षक सुभेदार तसेच बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे यांनी बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलातील जवानांनी झाडांना लागलेली आग आटोक्यात आणली.
आग वेळीच आटोक्यात आली नसती तर शेजारील दुचाकी तसेच चारचाकी वाहने देखील जळून भस्मसात झाली असती झाली असती, असे ॲड. कुणाल जाधव यांनी सांगितले.
आग लागलेल्या परिसरात विद्युत रोहित्र देखील आहे. तसेच आजूबाजूला सदनिका आहेत. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलातील शैलेश सोनवणे, अक्षय माने, मोहन शिंदे यांनी आग आटोक्यात आणली.