प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या प्रसिद्ध माघ मेळाव्यात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासांतील ही दुसरी घटना असून, यामध्ये १० हून अधिक कल्पवासियांचे तंबू जळून खाक झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे मेळावा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागताच परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि १० रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे ३० हून अधिक जवान बचावकार्यात गुंतले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी मंगळवारी संध्याकाळीदेखील मेळाव्यात भीषण आग लागली होती. त्या आगीत १५ तंबू आणि सुमारे २० दुकाने जळून खाक झाली होती. ही आग इतकी भयानक होती की, त्याचे लोळ ३ किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. ‘नारायण धाम’ शिबिरातील ५० हून अधिक कल्पवासी या आगीतून थोडक्यात बचावले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय सतुआ बाबा यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आगीचे कारण काय? अग्निशमन अधिकारी अनिमेष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शिबिरातील दिव्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. गवत आणि कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती शेजारच्या तंबूंमध्ये वेगाने पसरली. सध्या मेळावा प्रशासनाकडून कल्पवासियांच्या सुरक्षिततेसाठी आणि आगीच्या घटना रोखण्यासाठी अधिक खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, प्रयागराज येथील माघ मेळा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन धार्मिक उत्सव असून याला ‘मिनी कुंभ’ असेही संबोधले जाते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर हा मेळा भरतो, जिथे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या मेळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘कल्पवास’, ज्यामध्ये हजारो भाविक महिनाभर संगमाच्या काठी तंबूंमध्ये राहून अत्यंत साधेपणाने कठोर धार्मिक नियमांचे पालन आणि जप-तप करतात. या काळात देशभरातील साधू-संत आणि भक्तांच्या आगमनामुळे येथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा मोठा सोहळा पाहायला मिळतो. यावर्षी हा मेळा ३ जानेवारी २०२६ रोजी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू झाला असून, तो १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. आज १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुख्य शाही स्नान सोहळा संपन्न होत आहे.