भांडण झाले अन् महिलेला थेट स्कॉर्पियोखाली चिरडले; हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा राडा

Harihareshwar | कोकणातील हरिहरेश्वर येथे मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येतात. परंतु हरिहरेश्वर मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलरुम मधील भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादातून एका महिलेला पर्यटकांनी अंगावर गाडी घालून चिरडल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
काही पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत लॉज मालकास मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाही, त्यांनी लॉज मालकाच्या बहिणीच्या अंगावर स्कॉर्पियो घातली आणि तिला चिरडले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. ज्योती धामणस्कर असे मृत महिलेचे नाव आहे. त्यानंतर ते पर्यटक फरार झाले. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवड येथील काही पर्यटक हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास दाखल झाले होते. अभी धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे येऊन त्यांनी राहण्यासाठी रुमची विचारणा केली. यावेळी हॉटेल भाड्याच्या रकमेवरून त्यांचा आणि धामणस्कर यांचा वाद झाला. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर सर्वजण पळून जात असताना ज्योती धामणस्कर त्यांना अडवण्यासाठी पुढे गेल्या मात्र त्यांना गाडीखाली चिरडून हे सर्व जण पसार झाले. यातील एका पर्यटकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.





