पिंपरी | चिखलीत डांबरी रस्त्यावर टाकले कुंपण

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखलीतील शिवरकर चौकात साने चौकाकडे जाणार्या मार्गावर एका नागरिकाने चक्क डांबरी रस्त्यावर १२ ते १५ फूटापर्यंत पुढे तारेचे कुंपन टाकण्यासाठी लोखंडी रॉड रोवले आहेत. ही जागा आपल्या मालकीच्या असल्याचा दावा संबंधित व्यक्ती करत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने विकास आराखड्यानुसर रस्ते विकसित करण्यास सुरूवात केली आहे. चिखलीतील शिवरकर चौक येथून साने चौकाकडे जाणार्या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. विकास आराखड्यात हा रस्ता २४ मीटर आहे. मात्र दहा वर्षापूर्वी सुरूवातीला महापालिकेने येथील १८ मीटर रस्ता विकसित केला आहे. उर्वरित रस्ता विकासित करण्याचा मानस आहे.
येथील रस्त्याची एक बाजू पीएमआरडीएच्या अखत्यारित येते. तर दुसरी बाजू महापालिकेच्या हद्दीत येते. मात्र येथील काही नागरिकांनी थेट महापालिकेच्या रस्त्यावरच कुंपन टाकण्यासाठी राॅड रोवले आहेत व ही जागा आपलीच असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. या घटनेला चार दिवसांचा कालावधी उलटूनही महापालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. मात्र रात्रीच्या वेळी या रॉडला धडकून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर कोणी अतिक्रमण केले आहे का? हे पाहण्यसाठी बीट मार्शलला पाठविण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डांबरी रस्त्यावर एका नागरिकांने दावा सांगितला आहे. मात्र संबंधित व्यक्तीला नोटीस देण्यात येणार आहे. – सिताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी





