Pune District : शिरूरच्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Pune District : विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यातील सर्जनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, चिकित्सक विचार आणि विविध कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर दिला जातो. शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

शिरूर : शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध ‘मीमांसा’ संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका व सचिव नॅन्सी पायस यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या कुशल नेतृत्वासोबतच शाळेचे चेअरमन अनिल पायस यांचे मार्गदर्शन, शिक्षकवृंदाचे परिश्रम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालकांचा विश्वास यामुळे शाळेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये पारंपरिक शिक्षणपद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यातील सर्जनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, चिकित्सक विचार आणि विविध कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर दिला जातो. शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
अल्पावधीत राष्ट्रीय पातळीवर ठसा
शिरूर परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या शाळेने अल्पावधीतच पालक व विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे. शाळेतील शैक्षणिक वातावरण, आधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. त्यातूनच ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल ऑफ द इयर’ हा पुरस्कार शाळेला मिळाला.
‘संपूर्ण सेंट जोसेफ परिवाराच्या मेहनतीची पावती’
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्याध्यापिका व सचिव नॅन्सी पायस म्हणाल्या, “हा पुरस्कार आमच्या संपूर्ण सेंट जोसेफ परिवाराने केलेल्या अखंड परिश्रमाची आणि पालकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करण्यासाठी शिक्षणामध्ये सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण, संस्कार आणि संधी देण्यासाठी आमची वाटचाल यापुढेही सुरू राहील.”
या यशाबद्दल परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांनी मुख्याध्यापिका नॅन्सी पायस, चेअरमन अनिल पायस तसेच संपूर्ण सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा सन्मान अभिमानाची बाब मानली जात आहे.





