पुणे: महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत प्रतीवर्षी घेतल्या जाणाऱ्या रेखाकला परिक्षेच्या एलिमेंटरी ग्रेड आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यावर्षी सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून नुकतेच जाहीर करण्यात आले. या दोन्हीही परीक्षांसाठी आचार्य श्री विजय वल्लभ स्कुल मधील प्रविष्ट झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करून उत्तम श्रेणी प्राप्त करीत शाळेची 100% निकालाची शृंखला अखंडित ठेवली आहे. मागील गेल्या सतरा वर्षांपासून प्रशालेचा दोन्हीही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागत असून, यंदाच्या वर्षी एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या ३१ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांनी ‘A ग्रेड’ आणि १० विद्यार्थ्यांनी ‘B ग्रेड’ संपादित केली आहे. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या ४३ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी ‘A ग्रेड’, १० विद्यार्थ्यांनी ‘B ग्रेड’ आणि १० विद्यार्थ्यांनी ‘C ग्रेड’ संपादित करीत प्रशालेची मान अभिमानाने उंचावली आहे. संस्थेचे चेअरमन सुभाषजी परमार व मुख्याध्यापिका विमल परदेशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक प्रशालेचे कलाशिक्षक सचिन कवळे यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.