पिंपरी | शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलीस अधिकारी

कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील देवले या छोट्याशा खेडे गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा, वैभव रोहिदास आंबेकर याने आदर्शवत यश संपादन केले आहे.
वैभव आंबेकर याची एकाच आठवड्यात एसआरपीएफ गट क्रमांक २ आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीमध्ये निवड झाली आहे. या डबल धमाकामुळे वैभवच्या कुटुंबासह गावकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे.
असे यश मिळविणारा वैभव आंबेकर हा पंचक्रोशीतील पहिलाच युवक आहे. देवले गावातील शेतकरी रोहिदास आंबेकर आणि वैभवचे चुलते माजी सरपंच महेंद्र आंबेकर हे कार्ला परिसरात प्रगतशील शेतकरी आणि दुग्ध व्यवसायिक म्हणून ओळखले जातात.
वडिलांना शेतीकामात मदत करणारा वैभव याने त्याचे मार्गदर्शक अनिकेत उडाफे यांंच्या तळेगाव येथील यशस्वी करियर अकादमीत प्रवेश घेऊन परीक्षेची तयारी केली.
आता त्याने एसआरपीएफ गट नंबर २ आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती अशा दोन्ही परीक्षांत यश मिळविले आहे. आठ दिवसांपूर्नी आरपीएफ मध्ये आणि स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलात वैभवची निवड झाली. वैभवच्या या उत्तुंग यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





