Satara | कुरुळ येथील शेतकरी ओढ्यातून वाहून गेला

ठोसेघर, (वार्ताहर) – उरमोडी जलाशयाच्या पलीकडे असलेल्या कुरुळ येथील शेतकरी तात्याबा रावजी कुरळे (वय 80) हे दोन दिवसांपूर्वी गावानजीकच्या ओढ्यावर पाण्यासाठी गेले होते. ते तिथून परत आले नाहीत. ग्रामस्थांनी दोन दिवस शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह वडगाव हद्दीत धरणात आढळला.
याबाबत माहिती अशी, तात्याबा कुरळे हे बुधवारी (दि. 31 जुलै) गावानजीक बावीचा ओढा येथे गेले होते. त्या दिवशी पावसाचा जोर अधिक होता. खूप उशीर होऊनही ते घरी परत न आल्याने, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र, पावसामुळे ओढ्याच्या पात्रात जाता येत नव्हते.
त्यानंतर 1 ऑगस्टला कुरळे हे बेपत्ता झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून कुटुंबीय व ग्रामस्थ परिसरात शोध घेत असताना, शुक्रवारी गावापासून चार किलोमीटरवरील वडगाव हद्दीत, उरमोडी धरणात त्यांचा मृतदेह आढळला.
वडगावचे पोलीस पाटील संतोष कदम व ग्रामस्थ प्रशांत कुरळे यांनी ही माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर तात्याबा कुरळे यांचा मृतदेह दुपारी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात एक दिव्यांग मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.





