प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असणाऱ्या २९ अधिकाऱ्यांसह एकूण ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले, तसेच अनुकंपा तत्त्वानुसार आणि लाडे पागे समितीच्या शिफारशीनुसार ६३२ वारसांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम व अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या उपस्थितीत पदोन्नती समितीची बैठक झाली. बैठकीत आयुक्तांनी २०२५-२६ मधील पदोन्नती प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. मुद्रालय, नगरसचिव व अभियांत्रिकी संवर्गातील पदोन्नतीचे आदेश देण्याबरोबरच अनुकंप व लाडे पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना नियुक्तीची आज्ञापत्रे देण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात पदोन्नत्ती, तसेच वारस नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे या पदोन्नत्या वेगवेगळी कारणे देत रखडल्या होत्या.पदोन्नतीमध्ये वर्ग १ मध्ये २९, वर्ग २ मध्ये १५६, तर वर्ग ३ मध्ये ४१५ कर्मचार्यांचा समावेश असून, एकूण ६०० जणांना पदोन्नती मिळाली आहे. लाडे पागे समितीच्या शिफारशीनुसार ५६२ जणांना, तर अनुकंपा तत्त्वानुसार ७० वारसांना नियुक्ती देण्यात आली.पदोन्नती व नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या कार्याचा योग्य गौरव करणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यास महापालिका प्राधान्य देते, असे ते म्हणाले.काही पदांवरील पदोन्नती अनेक वर्षांनंतर झाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी, तसेच अनुकंप आणि लाडे पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरी मिळालेल्या वारसांच्या कुटुंबीयांनी महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.