Pimpri : सायकल ट्रॅक बनवला… पण वापर कोण करतय?

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याची कामे करताना कोट्यावधी रुपयांचा खर्च करून सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. हा ट्रॅक लक्षात यावा यासाठी त्यावर लाल रंगही मारण्यात आला. शहराच्या विविध भागात असे सायकल ट्रॅक आहेत. महानगरपालिकेने सायकल ट्रॅकची निर्मिती केली असली, तरी या ट्रॅकचा वापर करणारे नागरिक सध्या दुर्मीळ आहेत.
पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने साकारलेला हा ट्रॅक नागरिकांच्या माहितीतच नसल्याने, ‘ट्रॅक आहे, पण वापर नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. परदेशात सायकलला महत्व देऊन त्या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने सायकल ट्रॅकची निर्मिती केली असली, तरी वाहन चालक आणि नागरिकांना त्याचा उद्देश समजावून सांगण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना याबाबत कोणतेही प्रबोधन न झाल्यामुळे, “रस्त्यावर हे काय केलंय?” असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.
ट्रॅक पुसट, वापरही अपुरा
मार्गावरील खुदाई, अव्यवस्थित वाहतूक आणि पावसामुळे ट्रॅकची स्पष्टता कमी झाली आहे. लाल रंग धूसर झाल्याने अनेकांना तो लक्षातही येत नाही. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग नगण्य आहे.
पर्यावरणाचे संदेश, पण कृती कुठे?
पिंपरी चिंचवड महापालिकेने पंचतत्त्वावर आधारित कलाकृती बसवल्या आहेत. शहरातील विविध भागात ‘पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश’ या तत्वांचे प्रदर्शन करण्यात आले. मात्र, या कलाकृतींकडे बघणारे कमी आणि त्यांचा अर्थ समजणारे आणखी कमी, अशी स्थिती आहे.
उपक्रम चांगला, अंमलबजावणी ढासळलेली
सायकल ट्रॅकसारखा उपक्रम स्तुत्य आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सायकलचा वापर वाढावा, ही महानगर पालिकेची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, ट्रॅक वापरासाठी मानसिक आणि सामाजिक पातळीवर तयारी आवश्यक आहे. यासाठी महत्त्वाची जबाबदारी प्रशासनावरच आहे. शहरातील अनेक भागांमध्ये सायकल ट्रॅकच्या समोरच बस थांबा आहे. त्यामुळेही सायकल ट्रॅकचा वापर करता येत नाही.
पार्किंगसाठी होतोय वापर
शहराच्या विविध भागात पदपथ आणि रस्ता या दरम्यान सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. मात्र या मार्गावर अनेकजण आपली वाहने पार्क करताना दिसून येतात. रस्ता हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालकीचा असला तरी या रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणारे चालक आणि वाहनांवर कारवाईचे अधिकार हे वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलीस अगदी गल्ली बोळात जाऊन दुचाकींवर कारवाई करताना दिसतात. मात्र सायकल ट्रॅकवर उभ्या असलेल्या वाहनांवर सक्षमपणे कारवाई होताना दिसून नाही. त्यामुळे सायकल ट्रॅकवर वाहने उभी करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.
सायकल ट्रॅक तयार, पण नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये अनभिज्ञता
ट्रॅक स्पष्ट नसल्याने वापरात अडचणी
पालिकेकडून योग्य जनजागृती न झाल्याने उद्देश फसतोय
पंचतत्त्व कलाकृती मार्गांवर बसवल्या, पण प्रभाव अपुरा
जनतेच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन अपूर्ण





