प्रभात वृत्तससेवा वाघोली – वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेत नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.जागतिक पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार समाजातील सकारात्मक बदल घडवणार्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी दिला जातो. जयश्रीताई सातव पाटील यांनी सरपंच पद भूषविताना तसेच नंतरही गावातील पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, स्वच्छता आणि विकासाभिमुख उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे नेतृत्व, समस्या सोडवण्याची शैली आणि लोकसंपर्क यामुळे विविध योजनांचा प्रत्यक्ष फायदा ग्रामस्थांपर्यंत पोहोचला. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या उपक्रमांना स्थानिक तसेच बाहेरील पातळीवरही उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला.सामाजिक जाण, लोकहिताची निष्ठा आणि विकासाबद्दलची त्यांची बांधिलकी यामुळेच हा प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पुरस्कार त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वीही त्यांना सामाजिक योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वाघोली ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक संस्था आणि विविध संघटनांकडून सातव पाटील यांचे अभिनंदन होत आहे.