पिंपरी – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या मोटारींना आपल्या मोटारीने वारंवार धडक देऊन नुकसान करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) पहाटे बावधन येथील रामनगर परिसरात घडली.
स्वाती सौरभ मिश्रा (रा. रामनगर कॉलनी, बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दर्श सुभाष चावला (वय 28, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वाती मिश्रा पहाटे त्यांच्या मोटार एमएच-12-केटी-1736 घरी आल्या.
रस्त्याच्या बाजूला दर्श यांची नॅनो कार पार्क केली होती. स्वाती यांच्या डस्टर मोटारीने दर्श यांच्या नॅनो कारला धडक दिली. त्यानंतर वारंवार धडका दिल्या. त्यानंतर आणखी एका कारला धडक देऊन नुकसान केले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिलेने सोसायटीतील लोकांनाही शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला शिवीगाळ करीत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.