लघुउद्योजकांसाठी दिलासादायक उपक्रम : विश्वेश्वर सहकारी बँकेचा कर्ज मेळावा भोसरीत उत्साहात संपन्न

पुणे – दि विश्वेश्वर सहकारी बँकने पिंपरी – चिंचवड या उद्योग नगरीमध्ये लघू उद्योजकांसाठी कर्ज मेळावा एमसीसीआयए च्या भोसरी येथील कार्यालयामध्ये आयोजीत केला होता. विश्वेश्वर बँक ही पुण्यातील एक अग्रगण्य मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक असून, बँकेच्या 5 शाखा पिंपरी चिंचवड भागात आहेत.
बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात असून, बँक एकूण 30 शाखांच्या माध्यमातून गेली पाच दशके निरंतर ग्राहक सेवा देत आहे. बँकेचा मार्च 2025 अखेर एकूण व्यवसाय 3800 कोटी असून, बँकेला नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ़ इंडिया कडून शेड्युल्ड दर्जा प्राप्त झालेला आहे. सातत्याने लाभांश देणारी बँक म्हणून बँकेची ओळख व वैधानिक लेखा परीक्षणात सातत्याने बँकेस ‘ए’ ग्रेड आहे.
बँक सातत्याने विविध योजनेअंतर्गत ग्राहकांना कर्जपुरवठा करत असते, त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषानुसार अग्रक्रम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे लागते. त्या अनुषंगाने लघूउद्योजकांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे.
त्यामुळे बँकेने लघुउद्योजकांसाठी कर्ज मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्यास पिंपरी चिंचवड लघूउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, सचिव जयंत कड, संत साई विद्यालयाचे संस्थापक शांतलिंग ढवळेश्वर व तसेच बँकेकडून संचालक रविंद्र महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत व-हाडपांडे, सरव्यवस्थापक मिलींद केळकर, राम दराडे व सहाय्यक सरव्यवस्थापक अमृता कुलकर्णी उपस्थीत होते.
मेळाव्यामध्ये बँकेच्या लघूउद्योजकांसाठी असणा-या कर्ज योजना व इतर कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. लघूउद्योजकांनी त्यांना भांडवल उभारणीसाठी येणा-या अडचणीवर चर्चा केली. त्यावर बँकेकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. मेळाव्यामध्ये ढवळेश्वर यांनी व्यवसाया बरोबरच स्वत:च्या आरोग्याबाबत व मुलांच्या संस्काराबाबत योग्य मार्गदर्शन व सुचना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरव्यवस्थापक मिलींद केळकर व आभार प्रदर्शन सहाय्यक सरव्यव्यवस्थाक अमृता कुलकर्णी यांनी केले.





