weather update – राज्यात तापमानात चढ-उतार होत असल्याने पावसाचा जोर हळूहळू कमी होत आहे. कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वर असून, किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली येऊ लागला आहे. तसेच समुद्रातील चक्रीवादळाचे संकट हळूहळू ओसरत आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने आज कमी-अधिक प्रमाणात पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. पुढील काही दिवसांत पाऊस राज्याची रजा घेणार आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात बांगलादेशच्या किना-यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती आहे. राज्यात ७ नोव्हेंबर रोजी कोकण, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून आज सकाळी वातावरणात धुकं पाहायला मिळाले.