नवी दिल्ली – एका चिनी नागरीकाने गुजरातमध्ये 1,200 लोकांची तब्बल 1400 कोटी रूपयांची फसवणूक केली असून त्याने एक बेटिंग ऍप वापरून ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी केंद्र सरकार आणि गुजरात सरकारने श्वेत पत्रिका जारी करून नेमकी वस्तुस्थिती लोकांपुढे मांडावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आरोप केला की सरकार अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय आणि गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) सारख्या तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी करत आहे परंतु भारतीयांची “लूट” करून देशातून पळून जाणाऱ्या चिनी घोटाळेबाजांविरुद्ध या यंत्रणांचा वापर करीत नाहीं. या प्रकरणाच्या संबंधात माहिती देताना ते म्हणाले की, वू उयानबेने फुटबॉल सट्टेबाजी ऍपचा वापर करून गुजरातमधील लोकांना अवघ्या नऊ दिवसांत 1400 कोटी रुपयांची फसवणूक केली आणि देशातून पळ काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा त्यांना रोखू शकले नाहीत, असे पवन वर्मा म्हणाले. खेरा यांनी असा दावा केला की भाजपशासित उत्तर प्रदेशातील पोलिसांनी ‘दाणी डेटा ऍप’चे “प्रमोशन” केले होते असा आरोपहीं त्यांनी केला. खेरा यांनी सोशल मीडियावर उपलब्ध असलेली काही चित्रे प्रदर्शित केली ज्यात उत्तर प्रदेश पोलीस ‘दाणी डेटा ऍप’ प्रायोजित ‘लव्ह डोनेशन’ बॅनरसह पोज देताना दिसत आहेत. खेरा यांनी दावा केला की हा चिनी तंत्रज्ञ 2020-22 मध्ये भारतातच राहिला आणि त्याने बनावट फुटबॉल सट्टेबाजी ऍप तयार केले. ज्याचा वापर करून त्याने गुजरातमधील सामान्य लोकांकडून करोडोंची फसवणूक केली. आम्ही मागणी करतो की सरकारने सत्य बाहेर आणण्यासाठी आणि किती लोकांची फसवणूक केली आहे आणि घोटाळेबाज कोणाशी संबंधित आहेत हे शोधण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी,असे ते म्हणाले. मोदी सरकार सार्वजनिक पैशाचे संरक्षक नसून ‘फसवणूक करणारी’ ट्रॅव्हल एजन्सी आहे असा आरोपही त्यांनी केला. या फसवणूक प्रकरणात गुजरातमधील नागरीकांनी पोलिसांकडे 1088 तक्रारी दाखल केल्या आहेत असा दावाही त्यांनी केला. सरकारने चिनी ऍपवर बंदी घालण्याची घोषणा केली होंती पण प्रत्यक्षात मात्र गुजरात मध्ये याच चिनी ऍपचा वापर करून लोकांना फसवले जात आहे असे ते म्हणाले.