Dr. Ratnakar Mahajan passes away : पुरोगामी विचारांचा लढवय्या नेता हरपला; काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन
Dr. Ratnakar Mahajan passes away : समाजवादासोबतच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे त्यांनी केवळ समर्थनच केले नाही, तर ते आपल्या आचरणातूनही जपले.

Dr. Ratnakar Mahajan passes away : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारांच्या चळवळीतील एक अभ्यासू, लढवय्या आणि वैचारिक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आज दुपारी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आणीबाणीच्या काळात डॉ. महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान यांसारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
इंदापूर मूळ गाव
समाजवादासोबतच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे त्यांनी केवळ समर्थनच केले नाही, तर ते आपल्या आचरणातूनही जपले. डॉ. रत्नाकर महाजन यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर येथे झाले. शालेय जीवनापासूनच सामाजिक आणि वैचारिक चळवळीशी त्यांचा संबंध आला.
पुण्यात झाले स्थायिक
वाचनाची त्यांना मोठी आवड होती. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि पुढे पुणे हेच त्यांचे कर्मक्षेत्र बनले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरीही केली. या काळात विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला. त्यातून त्यांच्या सामाजिक आणि वैचारिक कार्याला अधिक व्यापक दिशा मिळाली.
डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन.
मनाला चटका लावणारी बातमी आहे. माझ्या वडिलांचे सक्खे मित्र आणि माझ्या बाबांसोबत आणीबाणी काळात एकत्र तुरुंगात राहिलेले त्यांचे ‘जेलमेट’ रत्नाकर काका.
त्यांच्या अभ्यासूपणाबद्दल, राजकीय कारकिर्द व नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष म्हणून केलेल्या कामांबाबत…— Asim Sarode (@AsimSarode) September 12, 2026
‘लोकबोधिनी’ या सामाजिक संस्थेची स्थापना
महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये सामाजिक आणि वैचारिक जाणीव निर्माण करण्यासाठी डॉ. महाजन यांनी ‘लोकबोधिनी’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून युवक-युवतींसाठी विविध शिबिरे आणि प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्यात पत्नी हेमा महाजन यांची खंबीर साथ लाभली. तसेच आयुष्यभर जोडलेल्या असंख्य मित्रांचा सहवासही त्यांच्या कार्याला बळ देणारा ठरला.
राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी दोन वेळा नियुक्ती
अभ्यासू वृत्ती, समाजाप्रती असलेली बांधिलकी, कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावीपणे मांडणी करण्याची हातोटी आणि पुरोगामी विचारांची निष्ठा यामुळे डॉ. महाजन यांना राजकारणातही महत्त्वाची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी दोन वेळा नियुक्ती झाली. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. या काळात त्यांनी मांडलेला मानवी विकास अहवाल विशेष चर्चेत आला आणि तो लोकाभिमुख ठरला.
अन् काँग्रेसमध्ये केला प्रवेश
मात्र, काही राजकीय मतभिन्नतेमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्वाचा विचार करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी आणि पुरोगामी विचारांची मशाल ते आयुष्यभर घेऊन चालले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी वैचारिक आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली असून, एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
Leopard Death : कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार





