Satara: साताऱ्यात सोमवारपासून रंगणार नाट्यकलेचा जागर
Satara राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ही स्पर्धा सोमवारपासून (दि. १६) येथील शाहू कलामंदिरात सुरु होत आहे. स्पर्धेतील नाट्यप्रयोग दररोज सायंकाळी सात वाजता सादर केले जाणार आहेत. सातारा आणि परिसरातील नाट्यसंस्थांनी नोंदविलेला २१ संस्थांचा सहभाग हा गेल्या काही वर्षांतील लक्षणीय टप्पा मानला जात आहे.

Satara: मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही रंगभूमीविषयीची ओढ कायम असल्याचे चित्र यंदाच्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील सहभागातून स्पष्ट झाले आहे. सातारा केंद्रावर यंदा तब्बल २१ नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदविला असून, नाट्यकलेच्या क्षेत्रात जिल्ह्यातील कलाकारांची वाढती सक्रियता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे यंदाची स्पर्धा केवळ पारितोषिकांची चढाओढ न राहता साताऱ्यातील रंगभूमीच्या समृद्धीचे व्यासपीठ ठरणार आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ही स्पर्धा सोमवारपासून (दि. १६) येथील शाहू कलामंदिरात सुरु होत आहे. स्पर्धेतील नाट्यप्रयोग दररोज सायंकाळी सात वाजता सादर केले जाणार आहेत. सातारा आणि परिसरातील नाट्यसंस्थांनी नोंदविलेला २१ संस्थांचा सहभाग हा गेल्या काही वर्षांतील लक्षणीय टप्पा मानला जात आहे.
पूर्वी काही वर्षे या स्पर्धेचे जिल्ह्याचे केंद्र बंद झाले होते. नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी जिल्ह्यातील हौशी कलाकारांना मोठ्या शहरांतील केंद्रांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, रंगकर्मींच्या पाठपुराव्यामुळे सातारा येथे स्वतंत्र स्पर्धा केंद्र सुरु झाल्याने स्थानिक कलाकारांना आपली अभिनयक्षमता, दिग्दर्शन कौशल्य आणि तांत्रिक कलागुण दाखविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत या केंद्राने जिल्ह्यातील नाट्यचळवळीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
यंदाच्या स्पर्धेतील वाढता सहभाग हा केवळ संख्यात्मक आकडा नसून स्थानिक नाट्यसंस्कृतीला मिळणाऱ्या नव्या बळाचे द्योतक आहे. नव्या पिढीतील कलाकार रंगभूमीकडे वळत असल्याने नाट्यक्षेत्रातील भविष्यासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. अभिनय, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि दिग्दर्शन अशा विविध अंगांनी नाट्यप्रयोगांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत स्पर्धक संस्थांना दिल्या जाणाऱ्या नाट्यनिर्मिती खर्चाच्या अनुदानासह पारितोषिकांच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे हौशी नाट्यसंस्थांना दर्जेदार निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
सातारकर नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक कलाकारांच्या कलाविष्काराला दाद द्यावी, असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक कल्याण राक्षे यांनी केले आहे. अत्यल्प तिकीट दरात दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.





