Jejuri News : जेजुरीत शिवसेना युवा अध्यक्षासह 5 जणांवर अपहरण, खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल

जेजुरी : जेजुरी शहर शिवसेनेचे युवा अध्यक्ष ओंकार नारायण जाधव आणि हर्षल गरुड यांच्यासह पाच जणांवर अपहरण, खंडणी मागणे आणि पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग हनुमंत पवार (रा. पवारवाडी, जेजुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बजरंग पवार हे दुचाकीवरून घरी जात असताना हर्षल गरुड याने त्यांना अडवले. त्यानंतर ओंकार जाधव आणि इतरांनी पवार यांना जबरदस्तीने फॉर्च्युनर गाडीत (MH 12 LZ 9191) बसवून मावडी पिंपरी गावच्या हद्दीतील एका शेतात नेले. तिथे डोक्याला पिस्तूल लावून शिवीगाळ करत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
“मला माझी गॅंग सांभाळावी लागते, माझी पोरं कमरेला घोडे लावून फिरतात, तुला मारायला वेळ लागणार नाही,” असे धमकावत आठ दिवसांत ५ लाख आणि दरमहा ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर पवार यांना मोरगाव चौकात सोडण्यात आले.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी भा.द.वि. कलम ३०८(२), १३७(२), १४०(२), ३५२, ३५१, १८९(२), १९१(२) आणि शस्त्र प्रतिबंधक कायदा ३(२५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करत असून, सर्व आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शिवसेनेच्या शहर युवा अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.





