satara | तडीपारी आदेशाचा भंग करणाऱ्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल

कोरेगाव, (प्रतिनिधी) – विविध गुन्ह्याखाली आरोपी असलेल्या अथर्व अजय पवार याला पोलीस अधिक्षकांनी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले असताना देखील, त्यांच्या आदेशाचा भंग करुन कोरेगाव व सातारा शहरात वावरत असताना पोलिसांना तो शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला. त्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार गणेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे, की अथर्व अजय पवार हा सातारा जकातनाका परिसरातील एका मंदिरानजिक वावरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठविले.
या पथकाने अथर्व पवार याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत.





