माजी आमदार बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल

गाडीच्या डिक्‍कीत सापडले 48 हजार 500 रुपये

पिंपरी –  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा अदखलपात्र गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अण्णा बनसोडे यांच्यासह रविंद्र हृदयनारायण दुबे (वय-43 रा. कामगारनगर,पिंपरी) याच्यावरही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील लिंकरोड पत्राशेड परिसरात स्विफ्ट गाडी (एमएच 14 एफएक्‍स 4553) या गाडीत बसून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केले जात होते. हा प्रकार सोमवारी (दि.29) सायंकाळी चारच्या सुमारास घडत होता.

उल्लेखनीय आहे की मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा खूपच चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुतेक सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते. पार्थ पवार यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान निवडणुकीच्या दिवशी शहरात पैसे वाटप होत असल्याच्या चर्चा दिवसभर होत होत्या. सोमवारी निवडणुकीच्या दिवशी पोलिसांना लिंकरोड पत्राशेड परिसरात पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 48 हजार 500 रुपये मिळाले. यावरून अण्णा बनसोडे यांच्यावर कलम 171 ब (1) व 171 ई प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.