अंडर 19 भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या ‘या’ खेळाडूवर गुन्हा दाखल

जालना – शिक्षक आणि पदवीधर मतदार संघावरून राज्यात राजकारण तापलेलं असताना जालन्यातून महत्वाची बातमी समोर आली आहे. अंडर १९ टीम इंडियाचा माजी कर्णधार विजय झोलवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. क्रिप्टो करन्सीच्या वादातून उद्योजन किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप झोल यांच्यावर करण्यात आला आहे.
विजय झोल हा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूवर अशा पद्धतीने गुन्हा दाखल झाल्याने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. झोल यांच्यावर एका तरुण उद्योजकाने जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केल्याने सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नेमके आरोप काय
विजय झोल यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली होती. करन्सीचा भाव घसरल्याने झोल यांनी आणि त्याच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उद्योजक किरण खरात यांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेटर विजय झोल यांची याबाबत नेमकी भूमिका काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. दुसरीकडे आता या प्रकरणावरून जालन्यातील राजकारण तापणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.





