ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

नाशिक : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर 3 वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता सुधाकर बडगुजर यांच्यां मुलासह इतर 6 जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





