साई संस्थानतर्फे संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

शिर्डी – अमरावती येथे एका सभेत संभाजी भिडे गुरुजींनी महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले व शिर्डीच्या साईबाबांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विधाने केल्याप्रकरणी साई संस्थानतर्फे संभाजी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वक्तव्याविरोधात आज (सोमवार) शिर्डीत ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढून साई संस्थानने भिडे गुरुजींविरोधात फिर्याद द्यावी, अशी मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर त्वरित साई संस्थानचे पोलीस सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी रीतसर फिर्याद देऊन संभाजी भिडे गुरुजींविरोधात साईबाबांविषयी अपशब्द वापरणे, बदनामी करणे व धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारे फिर्याद नोंदविली आहे. संस्थान प्रशासनाने घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे भिडे गुरुजी आता चांगलेच अडचणीत आले असून, राज्यभरात त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करून लोक निषेध व्यक्त करत आहेत, तर अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल झालेल्या आहेत.
शिर्डीमध्ये ग्रामस्थांनीही संभाजी भिडेंचा निषेध व्यक्त करून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन देऊन भिडे गुरुजींवर कायदेशीर कडक कारवाईची मागणी केली आहे. या वेळी शिर्डीचे कैलासबापू कोते, शिवाजीराजे गोंदकर, अभयराजे शेळके पाटील, कमलाकर कोते, विजय जगताप, दत्ता कोते, रवींद्र गोंदकर, संदीप सोनवणे, सचिन शिंदे, नितीन कोते, नीलेश कोते, दीपक वारुळे, महेश गोंदकर, भारत जगताप, अविनाश गोंदकर, अमोल कोते, विशाल कोते, नितीन कोते, सर्जेराव कोते, सद्दाम सय्यद आदी उपस्थित होते.
अपशब्द वापरणाऱ्यांना चपराक!
संभाजी भिडे गुरुजींविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दोन फिर्यादी दाखल झाल्या असून, यापुढे भारतातील महापुरुष व साईबाबांविषयी अपशब्द वापरणाऱ्यांना ही एक मोठी चपराक ठरणार आहे.





