नगर । दाऊद इब्राहिम समर्थनार्थ पोस्ट एकावर गुन्हा दाखल

पाथर्डी : मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम या गँगस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर ठेवल्याप्रकरणी तौफिक सादिक शेख (रा. मिरी ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर सातपुते याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सातपुते यांना त्यांच्या मित्राने व्हॉटसअॅपंवर बुलेट भी एकही है..और एकही जान, हर बुलेट पे लिखा है… मरनेवाले का नाम या गाण्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम हा दिसत असलेली स्टोरी असलेला व्हिडीओ पाठवला.
स्टोरी कोणी तयार केली याची माहिती घेतली असता तौफीक सादीक शेख याने १९ ऑक्टोबरला इन्स्टाग्रामवर दाऊद इब्राहिम या गँगस्टरचे समर्थनार्थ स्टोरी प्रसारित केली होती. गँगस्टर दाऊद इब्राहिम हा मुंबई येथे सन १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. तौफीक शेख याने दोन गट किंवा दोन समाजामध्ये शत्रुत्वांची किंवा द्वेषाची भावना किंवा दुर्भावना निर्माण करण्याचे हेतूने इन्स्टाग्रामवर पोस्ट प्रसारीत झाल्यामुळे जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





