नवी दिल्ली – यमुना एक्सप्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका बसचे नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली. त्यामुळे मागून येणारी कार बसला धडकली. या अपघातादरम्यान बस आणि कारला भीषण आग लागली. या आगीत पाच जणांचा जिवंत जळाल्याने मृत्यू झाला. ही घटना मथुरेतील महावन पोलीस स्टेशन हद्दीतील माईल स्टोन ११७ येथे घडली. मथुरा पोलिसांनी सांगितले की, यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग्राहून नोएडाला जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर एक कारही बसला धडकली. बस आणि दोन्ही वाहनांना आग लागली. बसमधील प्रवासी जीव वाचवण्यात यशस्वी झाले, परंतु कारमधील लोक जळून मरण पावले. अपघातानंतर अर्धा तास उलटूनही अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या घटनेमागील कारणाबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. गेल्या महिन्यात यमुना द्रुतगती मार्गावर दोन बसची धडक होऊन किमान ४० जण जखमी झाले होते. उत्तर प्रदेशमधील 6-लेन रुंद आणि १६६ किमी लांबीचा एक्सप्रेसवे देशातील सहावा सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे आणि तो ग्रेटर नोएडा ते आग्राला जोडतो.