मुंबई : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जावेद पठाण (वय 66) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी 10 ते 11 या वेळेत प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, जावेद पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजकीय वर्तुळात शोककळा जावेद पठाण हे मिरा रोड भागात सामाजिक कार्यकर्ता आणि स्थानिक स्तरावर ओळखले जाणारे नेते होते. त्यांच्या अचानक निधनामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती मिळताच शोक व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. निवडणूक नियमांनुसार काय होणार? निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द होऊ शकते किंवा नवीन उमेदवार उभे करण्याची संधी पक्षाला मिळू शकते. मात्र, हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील परिस्थिती आता पूर्णपणे बदलली असून, राष्ट्रवादीकडून लवकरच या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.