पुणे | दिवाळसणाच्या तोंडावरच दरवाढीचा दणका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मागील हंगामात गहू, हरभरा आणि मसूरचे उत्पादन घटले होते. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात याआधीच मोठी वाढ झाली आहे.
त्यात केंद्र सरकारने किमान आधार किंमत निश्चित केल्याने ऐन दिवाळीत गहू, रवा, मैदा, आटा, बेसन पीठ, चणाडाळ आणि अख्खा मसूर व मसूर डाळींच्या दरात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यासह देशात गहू, हरभरा आणि मसूरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे हे पदार्थ व त्यापासून तयार होणार्या पदार्थांचेही दर वाढलेले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारातील दर अधिक आहेत.
या वाढलेल्या दरामुळे नागरिक आधीच त्रस्त झाले असताना पुन्हा त्यात दरवाढीची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटकाही सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानातून गव्हाची आवक होते. हरभर्याची आवक मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह ऑस्ट्रेलियातून होते, तर मध्य प्रदेश आणि तुर्की येथून मसूरची आवक होते.
देशात हरभर्याचे उत्पादन घटल्याने ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात हरभरा आयात करण्यात आला होता, तर मसूर तुर्की येथून आयात केला जातो. गव्हाचे दर वाढल्याने गव्हासह रवा, मैदा, आट्याचे दर वाढलेले आहेत.
हरभर्यामुळे चणाडाळ आणि बेसन पीठाचे दर वाढले आहेत. पुढील चार दिवसांत सध्या आहेत त्यापेक्षाही दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत वाढलेल्या दराचा सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.
दरात वाढ होण्याची शक्यता
सरकारने सहा पिकांची किमान आधार किंमत वाढविली आहे. मात्र, गहू, हरभरा आणि मसूरची खुल्या बाजारातील किंमत सरकारच्या किमतीपेक्षा खूपच अधिक आहे.
पुन्हा सरकारने किंमत ठरविली असल्याने गहू, हरभरा आणि मसूरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचे मुख्य कारण घटलेले उत्पादन आहे. – नितीन नहार, डाळींचे व्यापारी, मार्केट यार्ड.
हरभरा, गहू, मसूरचे दर
पदार्थ आधीचा दर सरकारचा दर खुल्या बाजारातील दर
गहू 2300 2425 3500 ते 5000
हरभरा 5650 6000 8000
मसूर 6400 6700 7200





