Mookuthi Amman 2 : १०० कोटींचं बजेट, पण ओपनिंग फक्त ३ कोटी; नयनताराच्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मोठा झटका
Mookuthi Amman 2 : 'मुकुथी अम्मान २'ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे १.८८ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Mookuthi Amman 2 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हिचा बहुचर्चित तमिळ फँटसी-कॉमेडी थ्रिलर ‘मुकुथी अम्मान २’ अखेर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे.
पहिल्या दिवसाची कमाई किती?
‘मुकुथी अम्मान २’ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे १.८८ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, तमिळ आणि तेलुगू या दोन्ही भाषांतील प्रदर्शनातून चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे २.१५ कोटी रुपयांची कमाई केली.
चित्रपटाच्या कमाईत तमिळ व्हर्जनचा सर्वाधिक वाटा आहे. तमिळ भाषेतील १,८८१ शोजमधून चित्रपटाने सुमारे १.७५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. दुसरीकडे, तेलुगू व्हर्जनला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला.
View this post on Instagram
‘मुकुथी अम्मान २’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. मात्र, एवढी मोठी गुंतवणूक असूनही पहिल्या दिवसाची कमाई अपेक्षेच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत वाढ होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘मुकुथी अम्मान २’चे दिग्दर्शन सुंदर सी यांनी केले आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुकुथी अम्मान’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. वेल्स फिल्म इंटरनॅशनल आणि राऊडी पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नयनतारासोबतच रेजिना कॅसांड्रा, दुनिया विजय, उर्वशी, अभिनया आणि योगी बाबू हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.





