शेतीच्या वाटणीचा वाद! भावाचा वंश संपवण्याची धमकी देऊन 4 वर्षाच्या पुतणीला नदीत फेकले, मोहोळमधील घटना

सोलापूर – शेतीच्या वादातून भावाने सख्ख्या भावाच्या 4 वर्षीय मुलीला नदीत फेकून तीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे (वय 4 वर्ष) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर यशोदीप धावणे असे आरोपीचे नाव आहे.
ययोधन आणि यशोदीप हे दोघे भाऊ आहेत. त्यांना वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे. यातील दोघांच्या नावे प्रत्येकी पाच एकर जमीन आहे. शिल्लक असलेली सहा एकर जमीन त्यांच्या आईच्या नावावर आहे. मात्र आईच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी यशोदीप हा यशोधन यांच्याशी सातत्याने भांडण करत होता. गावातील नागरिकांनी अनेकदा यशोदीप याची समजूत काढली मात्र तो कोणाचेही ऐकता नव्हता.
दरम्यान, सोमवारी 20 फेब्रुवारीला सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले. आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीपने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो, अशी धमकी दिली. गावातील लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. त्यानंतर यशोधन हे आपल्या मुलीला घरी ठेवून पत्नीसह शेतात गेले. काही कामानिमित्त घरी परतले असता त्यांना ज्ञानदा घरी दिसली नाही. त्यांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली असता यशोदीप यांनी तिला दुचाकीवर बसवून नेल्याचे सांगितले.
यशोधन यांनी भाऊ यशोदीपला फोन केला असता तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीत फेकून दिल्याचे सांगितले. असे ऐकताच यशोधन यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली. तिथे नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. तात्काळ स्थानिक नागरिकांनी तिला नदीतून काढून मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शेतीच्या वाटणीच्या वादातून अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या केल्याने सख्ख्या काकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चिमुकलीचा नाहक बळी गेल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.





