वळसे-पवार कुटुंबाच्या परंपरेला ४४ वर्षांत प्रथमच पडला खंड

मंचर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी 44 वर्षांत प्रथमच वळसे पाटील कुटुंबाशिवाय 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील शिवलिंगाचे शनिवारी (दि. 26) दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी खासदार सुप्रिया सुळे होत्या. मात्र सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे जागोजागी स्वागत केले; परंतु शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कोणतीच खबर नसल्याने त्यांना दौरा झाल्यानंतर माहिती मिळाल्याचे समजते.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी श्रावण महिन्यात पवार कुटुंबीय भीमाशंकराच्या दर्शनासाठी येतात. यावेळी वळसे पाटील कुटुंबीयांतील दिलीप वळसे पाटील किंवा त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील या कायमच त्यांच्यासोबत भीमाशंकरला असायचे. मात्र, यावेळी प्रथमच वळसे पाटील कुटुंबीयातील एकही सदस्य बरोबर न घेता प्रतिभा पवार व सुप्रिया सुळे यांनी भीमाशंकरचे दर्शन घेतले. भीमाशंकरला आल्यानंतर वळसे पाटील कुटुंबीय पवार कुटुंबीयांचे स्वागत करायचे.
मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे गेली 44 वर्षे एकत्र भीमा शंकराचे दर्शन घेणारे वळसे पाटील व पवार कुटुंबीय यांच्या परंपरेला मात्र खंड पडला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले स्वागत
प्रतिभा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे आंबेगाव तालुक्यात दाखल झाले असता शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उद्योजक बाबाजी टेमगिरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समर्थकांनी त्यांचे मंचर बायपास येथे स्वागत केले. घोडेगाव येथेही सरपंच अश्विनी तिटकारे, उपसरपंच सोमनाथ काळे, अजित पवार-वळसे पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिभा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यात आले.





