Former MLA Dagdu Dada Sakpal : आज ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवाजी पार्कवर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेतून ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे ठाकरेंसोबत तब्बल ५९ वर्षाचे योगदान देणाऱ्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती धनुष्यबाण घेतला आहे. ही घडामोड निवडणुकीच्या अवघ्या पाच दिवस शिल्लक असताना घडल्याने उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का देणारी आहे. ठाकरे गटाचे आधारस्तंभ आणि शिवसेनेत ५९ वर्षांचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते, माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांचा पक्ष प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन या निवासस्थानी झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच दगडू दादा सकपाळ यांनी एकनाथ शिंदेंची भेटी घेतली होती. त्यानंतर ते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. भावूक प्रतिक्रिया बालेकिल्ल्यातच शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत ठाकरेंना धक्का दिला आहे. सपकाळ यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदेंच्या शिवसेनेते दाखल झाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “मी आयुष्याची ५९ वर्षे एकाच घरात काढली. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही घडलो. मात्र, गेल्या काही काळापासून तिथे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे.” असे माजी आमदार दगडू दादा सपकाळ म्हणाले. लालबाग-परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. दगडू दादा सपकाळ यांनी शिंदेंसेनेत प्रवेश का केला यावर भाष्य करताना ते म्हणाले, निर्णयप्रक्रियेत ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान उरलेला नाही. ज्या पक्षात विचारांची किंमत नाही, तिथे राहणे कठीण झाले होते. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत आणि आणि इथेही धनुष्यबाणच आहे, म्हणून मी हा मार्ग निवडला, असे दगडू दादा सपकाळ यांनी सांगितले. थेट संघर्ष दरम्यान, दगडू दादा सकपाळ हे लालबाग, परळ आणि शिवडी भागातील दांडगा जनसंपर्क असलेले नेते आहेत. त्यांची ५९ वर्षींची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असून ते प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, सपकाळांच्या जाण्याने आता तिथे शिंदे विरोध ठाकरे असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे. हेही वाचा : नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न? बेवारस बॅगेतील चिठ्ठीत नेमका काय दिला संदेश?