Hingoli News : धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी; 12 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बारा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २४ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा जहांगीर येथे एका मिरवणुकीमध्ये गावातील प्रविण पाईकराव याचा प्रणव हरण यास धक्का लागला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला होता. शाब्दिक चकमकीनंतर मारहाणीला सुरवात होण्यापुर्वीच गावकऱ्यांनी सर्वांना समजावून सांगितल्यानंतर वाद मिटला होता. दरम्यान, त्यानंतर रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही वेळातच पुन्हा वादाला तोंड फुटले.
यामध्ये बारा जणांनी मिळून गावातील प्रविण पाईकराव व नागसेन डोंगरे यांना मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळे, उपनिरीक्षक इंगळे, जमादार प्रशांत शिंदे, गजानन होळकर, कैलास सातव यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.





