पुणे जिल्हा | काळी आई दहा पिढ्या हिरवीगार होईल

पारगाव, (वार्ताहर)- मुळशी धरणाचे पाणी पूर्वमुखी वळविण्याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होणार असून खडकवासला ते फुरसुंगी हे बंदनळी पाणी आणण्याची वर्क ऑर्डर आचारसंहितेच्यापूर्वी काढली जाईल. बेबी कालवा अस्तरीकरणाचे १८० कोटी रुपयांचे काम मंजूर आहे.
जनाई शिरसाई उपसा सिंचन बंद नळीतून करण्यासाठी फेर अंदाजपत्रक बनविण्याचे काम चालू आहे. सर्व योजना कार्यान्वित झाल्यानंतर पुढील दहा पिढ्या दौंडची काळी आई हिरवीगार राहणार आहे, अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चौफुला येथे २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व शेतकरी मेळावा व स्व. सुभाष अण्णा कुल कृषिभूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी कुल बोलत होते.
कुल म्हणाले, दौंड बाजार समिती कायद्याच्या चौकटीत राहून व्यापार वाढवेल. जिल्ह्यात अव्वल होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत.
गरज भासल्यास केंद्र व राज्यातून निधी उपलब्ध केला जाईल. भौतिक सुविधा निर्माण करून शेतकरी व व्यापाऱ्यांना फायदा होईल, असे काम पुढील काळात बाजार समिती करेल. यावेळी कुल यांनी बाजार समितीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, कांचन कुल, बाजार समितीचे संचालक, सभासद, पुरस्कारप्राप्त शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.
कृती, प्रयोगशील शेतकऱ्यांचा थाटात गौरव
उत्कृष्ट ऊस उत्पादक- दादा शिंदे, ज्ञानेश्वर कापसे, धनंजय कोडीतकर, अर्जुन शिरसाट. उत्कृष्ट सेंद्रिय गूळ उत्पादक- भाऊसाहेब आटोळे, राजेंद्र कदम, विकास म्हेत्रे.
उत्कृष्ट कुक्कुटपालक योगेश कुंजीर, प्रदीप सोडनवर, तात्यासाहेब भोंडवे. उत्कृष्ट पाणी नियोजक – धनंजय आटोळे. उत्कृष्ट महिला शेतकरी सुवर्णा गुंड, वंदना वाघमोडे. उत्कृष्ट फळे भाजीपाला उत्पादक – हौशीराम आटोळे, नवनाथ होले,
बाळकृष्ण पाचपुते, हनुमंत जांबले, तुषार म्हेत्रे, संतोष चव्हाण, संदीप जगताप, दिनेश भुजबळ, तुकाराम कतुरे. उत्कृष्ट कांदा उत्पादक- संतोष बोत्रे, ज्ञानेश्वर मगर, जयसिंग बोरकर, अर्जुन गिरमकर, गोरख शेळके.
उत्कृष्ट आंतरपीक उत्पादक- राहुल पवार. उत्कृष्ट तंत्रज्ञान वापर – सुहास नागवडे. गोरख रसाळ. उत्कृष्ट शेतमाल प्रक्रिया उत्पादक – समीर डोंबे. उत्कृष्ट खरीप पीक उत्पादक- लक्ष्मण रांघवण. उत्कृष्ट दूध उत्पादक:- यशवंत जाधव.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रयोगशील शेतकऱ्यांना स्व. सुभाष अण्णा कुल कृषिभूषण पुरस्कार प्रदान करताना आमदार राहुल कुल. समितीचे पदाधिकारी.





