विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगानं घेतला, ‘मोठा निर्णय’

Maharashtra Assembly Election 2024 । विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे, अशी मागणी केली होती. मात्र विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्यास नकार दिला होता.
आता मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्हाबाबत नवे सुधारित आदेश दिले आहेत. हे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
नवे सुधारित आदेशानुसार, मुख्य निवडणूक (Election) अधिकारी कार्यालयाने गुरुवारी (ता.31) रात्री उशिरा पिपाणी चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले.त्यात तयार केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीमधील ‘Trumpet’ या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण ‘तुतारी’ ऐवजी ‘ट्रम्पेट’ असे सुधारित करण्यात येत आहे. या संदर्भात निवडणूक चिन्हांचा तक्ता PDF मध्ये आपणांस उपलब्ध करून देण्यात येत आहे. या आदेशामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत झालेला बसलेला फटका यावेळी बसणार नसल्याची शक्यता वर्तवतली जात आहे.
या परिपत्रकात नमूद केले आहे की, ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करते वेळी व अन्य आवश्यक प्रयोजनासाठी सुधारित तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार ‘ट्रम्पेट’ मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ‘ट्रम्पेट’ असे दर्शविण्यात यावे असा महत्त्वपूर्ण आदेश निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात दिला आहे. त्यामुळे मतदारांचाही मतदान करतेवेळी गोंधळ उडणार नाही. आणि चिन्हांबाबत स्पष्टता येईल. या नव्या आदेशामुळे शरद पवार पवार गटाला दिसला मिळणार आहे.
शरद पवारांनी काय केली होती मागणी
शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र देण्यात आलं, यात फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली होती. फ्री सिम्बॉलमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला होता. तसेच तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा आकार वाढवण्याची मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती.






