पुणे | अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्राच्या राजकारणातील भाषा खालच्या स्तराला गेली आहे. त्यांना समजावणारे कोणी नाही. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केले.
राजकारण्यांचे कान धरून तुम्ही त्यांना जमिनीवर आणणे, शिकवणे, सांगणे हे तुमचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता, असेही ठाकरे म्हणाले.
दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले.
यावेळी मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, सरहदचे प्रमुख संजय नहार, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस आदी उपस्थित होते.
आताच्या राजकारण्यांची भाषा ऐकताना त्यांना ठणकावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक कवी मी पाहत आलोय.
मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात, मनात रुजलेला असायचा. योग्यवेळी बिघडलेल्या संस्कृतीविषयी आणि राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची हिंमत, धमक साहित्यिकांमध्ये होती ती आता कमी झालेली मला दिसत आहे, अशा खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
साहित्यिक हे ट्रोलिंगला घाबरतात. त्याचा विचार करू नका. आजपर्यंत मी अनेक भाषणे दिले आहेत, त्यात जे बोलायचे ते बोललो आहे. परंतु त्यानंतर काय छापून येते, किंवा कोण काय बोलते आहे ते मी पहात नाही, त्या भानगडीत मी पडत नाही.
माझे बोलून झाले, विषय संपला त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायलाही मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाहीत आणि जे तुमचा द्वेष करतात ते तुमचे स्पष्टीकरण ऐकत नाहीत, असे ठाकरे यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात राजकारणाची सर्कस
देशाला दिशा देणरे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, परंतु या महाराष्ट्रातच राजकारणाची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकी चाळे करत आहे.
मंत्रालयात कुणी जाळीवर उडी मारत आहेत असे सांगून महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक लोक आहेत त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावले पाहिजे, अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली.
राजकारण्यांची भाषा इतक्या खालच्या थराला गेली आहे. ज्या महाराष्ट्रातील बुजूर्ग म्हणावे तेच अशा राजकारण्यांच्या आहारी गेले आहेत. पुढच्या पिढीला ही भाषा म्हणजे राजकारण वाटेल अशी स्थिती आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.





