गुरुवर्य डॉ. न. म. जोशी, ११ जानेवारी २०२६ रोजी आपण एक्क्याण्णव्या वर्षांत पदार्पण करीत आहात, त्यानिमित्ताने आपल्या यशस्वी वाटचालीस विनम्र अभिवादन! आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सर्वांनाच भावते. आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला तीन लक्ष रुपये दिले ही विशेष कौतुकाची बाब आहे. गारवडे या दुर्गम भागातील खेड्यात आपण शिक्षणाचा श्रीगणेशा केलात. त्यानंतर सातारा, सांगली, जळगाव, सोलापूर अशी भ्रमंती करीत पुणे येथे स्थिरावलात. एस.टी.सी., सी.पी. एड. उत्तीर्ण होऊन आपण शिक्षकी पेशा स्वीकारलात. त्यानंतर एम. ए., एम. एड, पीएच.डी. अशी उच्च पदवी संपादन केलीत. पुण्याच्या नू. म. वि. प्रशालेत शिक्षक, नंतर पर्यवेक्षक व पुढे टिळक प्रशिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक अशी शिक्षण क्षेत्रातील आपली दमदार वाटचाल आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच आपण साहित्य क्षेत्रातही नावलौकिक प्राप्त केला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यवाह, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष, एकता मासिकाचे संपादक अशा संस्थात्मक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. आपले मराठी भाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी आणि सिंधी भाषे- वरही प्रभुत्व आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न आपण खऱ्या अर्थाने पूर्ण केले आहे. महाराष्ट्रभर आपण विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. तसेच ६० ग्रंथांचीही निर्मिती केली आहे. मुलांबरोबरच मोठ्यांसाठीही आपण लेखन केले आहे. मुलांसाठी बोधकथा, मूल्यकथा, भारत कथा, पर्यावरण कथा, पाखरांची शाळा, बालनाट्ये, एकांकिका, चरित्रे असे विपुल लेखन केले आहे. प्रौढांसाठीही निःष्प्रेम, निःस्पृह, प्रेषित यांसारख्या कादंबऱ्या, ‘पत्रकारांचा शिक्षण विचार’ हा वैचारिक ग्रंथ, अनेक कथासंग्रह आणि अनुवादित साहित्याचे लेखन केले आहे. साने गुरुजींच्या लेखणीसारखी आपली लेखणी रंजनाबरोबर डोळ्यात अंजनही घालते. आपले ‘बखर एका सारस्वताची’ हे आत्मचरित्रात्मक लेखन मराठी साहित्यविश्वात दीपस्तंभासारखे दिशादर्शक असे आहे. आपल्या आयुष्यातील दीर्घ वाटचालीत आपणास काही काळ साने गुरुजी, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, गो. नी. दांडेकर अशा अनेक मान्यवरांचा सहवास लाभला आणि आपले आयुष्य सुगंधीत झाले. आदर्श शिक्षक, अभ्यासू वक्ता, बहुप्रसव लेखक, बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी आपली महाराष्ट्राला ओळख आहे. आपण स्वतः विद्यावाचस्पती असून, आपल्या समग्र साहित्यावर विविधांगाने चार विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे. त्यात मीही एक तुमचा विद्यार्थी आहे. एक्याण्णवव्या वर्षातील पदार्पणानिमित्त पुन्हा एकदा आपणास दीर्घायुरारोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, जय जगत ! – डॉ. दिलीप गरूड, पुणे मो. क्र. ९९६०२५९०८५.