खेळताना दोरीचा फास लागल्याने 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईमधील गोवंडी येथील शिवाजीनगरात खेळताना दोरीचा फास लागल्याने एका 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलगी भावडांसोबत लपाछपीचा डाव खेळत असता ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना घडली तेव्हा या चिमुकलीचे आई-वडील घरात नव्हते. शेजाऱ्यांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
आकृती सिंह असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, आकृती ही रविवारी तिच्याभावंडासह लपाछपीचा खेळ खेळत होती. लपाछपीचा डाव सुरु असताना सगळे वेगवेगळ्या ठिकाणी लपले. तर, आकृती ही पोटमाळ्यावर लपली. खेळ सुरु असताना पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकला.
हे पाहिल्यानंतर आकृतीच्या मोठ्या बहिणीने आरडाओरडा सुरू केला. तसेच शेजाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आकृतीला तातडीने परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आकृतीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.





