नोएडामध्ये पाया खोदताना 3 मजली इमारत कोसळली

नवी दिल्ली : नोएडातील बहलोलपूर गावात तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारत कोसळल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक जण अडकल्याचा संशय आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि इतर मदत पथके हजर आहेत. सर्वजण इमारतीचा ढिगारा हटवण्यात व्यस्त आहेत. इमारतीजवळच पाया खोदला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सेक्टर 63 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सेक्टर 63 पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराजवळ बहलोलपूर येथे एका मोकळ्या भूखंडाचा पाया खोदला जात होता. दरम्यान, पाया खोदत असताना बाजूच्या घराची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखालून दोन जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इमारत कोसळल्यानंतर आरडाओरडा झाला. इमारतीतील लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. बुलडोझरच्या सहाय्याने ढिगारा हटवला जात आहे.





