मुंबई – मालाड येथे शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून एका 26 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जेनेल फर्नांडिस असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. मालाडच्या चिंचोली फाटक येथे सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी दुपारी जेनेल फर्नांडिस यांचा क्लास संपल्यानंतर त्या सहाव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरील स्टाफ रूममध्ये जाण्यासाठी थांबल्या होत्या.
त्यांनी लिफ्टचे दार उघडल्यानंतर त्यांनी आत पाउल ठेवताच दार बंद व्हायच्या अगोदरच लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. त्यांनी तात्काळ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्या अडकल्या आणि लिफ्टसोबत फरफटत गेल्या. गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेला पाहुन अन्य कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावले व त्यांना बाहेर काढण्यात आले. नंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला.