गावकऱ्यांनी 21 वर्षीय तरूणीला केले सरपंच; शुभेच्छांचा वर्षाव

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील सोनू भालेराव वयाच्या 21 वर्षी गावाची कारभारीन झाली आहे. तिने नर्सिंगचा कोर्स केला आहे. आत्ता ती गावचा कारभार पाहणार आहे. अवघ्या २१ वर्षांची तरुणी गावच्या विकासासाठी सरपंचपदावर विराजमान झाली.
कळमनुरी तालुक्यातील थेट जनतेतून सरपंच पदासह एकूण बारा जागेसाठी २६ उमेदवार रिंगणात होते. यात बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप काकडे यांनी जय श्रीराम ग्राम विकास पॅनल उभे केले होते. यांचा १२ जागी पैकी सरपंच पदासह एकूण ८ जागेवर विजय झाला आहे. वाकोडी गावात २१ वर्षाची नर्सिंग झालेली मुलगी गावची सरपंच झाली आहे.
जयदीप काकडे यांचे पॅनलचे निवडून आलेले उमेदवार –
सरपंच पदाचे उमेदवार यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना ५३५ मताची आघाडी घेऊन पराभूत केले व आपला ५३५ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला आहे. सोनू भालेराव यांना मिळालेली मते ११९२ आहेत. वंदना धोंडिबा नरहरे – ४१३, देवराव राजाराम गोरे – ४२२, ओमप्रकाश विठ्ठल सोळंके – ४१५, सुनीता लक्ष्मण काळे – ३६६, बालाजी दत्तराव सुरोशे – ३६१, अनिता उत्तमराव तास्के – ३६९, शिलानंद विलास २६६ -कांबळे हे उमेदवार निवडून आले आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सखाराम उबाळे व माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भवर यांनी आघाडीचे मिळून महाविकास आघाडीचे ग्रामविकास पॅनल उभे केले होते. त्यांना चार जागेवर समाधान मानावे लागले. दोन्ही तालुका प्रमुखांची प्रतिष्ठापणा लागली होती. यात बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख आमदार संतोष बांगर यांचे विश्वासू जयदीप काकडे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख सखाराम उबाळे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.
जयदीप काकडे यांचा वार्ड क्रमांक १ हा बालेकिल्ला असून यांनी वार्ड क्रमांक १ मध्ये तीन जागे पैकी तिन्ही जागेवर विजय मिळवला. तर शिवसेना तालुकाप्रमुख सखाराम उबाळे यांचा वार्ड क्रमांक २ हा बालेकिल्ला असून यांचा वार्ड क्रमांक २ मध्ये बाळासाहेबांचे शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप काकडे यांनी तीन पैकी तीन उमेदवार निवडून आणले व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख सखाराम उबाळे यांना यांच्या वार्डामधूनच प्रभावाला समोर जावे लागले. तर माजी उपसरपंच शिवाजी भवर यांचा वार्ड क्रमांक ४ हा बालेकिल्ला असून त्यांनी सुद्धा त्यांच्याबालेकिल्ला तीन पैकी तीन उमेदवार निवडून आणले आहेत.
जयदीप काकडे यांच्या पॅनलला बहुमत मिळवण्यासाठी युवा कार्यकर्ते बालाजी सुरुशे, सचिन सोळंके, देवराव गोरे यांनी स्वतः रिंगणात उतरून यांनी उमेदवारी लढवून यात विजय मिळविला व भारतीय जनता पार्टीचे कळमनुरी तालुका सरचिटणीस विकास जाधव यांनी पण जयदीप काकडे यांच्या पॅनलला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
पॅनलला आठ तर महाविकास आघाडीच्या पॅनलला चार जागेवर वाकोडी येथील मतदारांनी जे आमच्या पॅनलला १२ पैकी ८ जागेवर निवडून देऊन आमचे हात बळकट केले आहेत. त्या बदल सर्वप्रथम मी वाकोडी ग्रामस्थांचा आभारी आहे. येणाऱ्या काळात नक्कीच युवा सरपंच सोनू भालेराव आणि आम्ही मिळून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देऊ व आमदार संतोष बांगर यांच्याकडून जास्तीत जास्त विकास कामे आणून वाकोडी गावचा विकास करू, असे मत जयदीप काकडे यांनी डिजिटल प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आमदार संतोष बांगर यांच्या वतीने काल सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सोनू भालेराव यांचा सत्कार करण्यात आला आहे
विकासासाठी प्रयत्न करणार –
विजयानंतर प्रतिक्रिया देताना सोनू भालेराव म्हणाल्या की, ‘गावाच्या विकासाचा माझा अजेंडा होता. तो मतदारांनी स्वीकारला आहे. आता जबाबदारी वाढली असून, गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.





