पालघर : पालघर जिल्ह्यात लग्नाच्या बहाण्याने २० वर्षीय आदिवासी महिलेला ३ लाख रुपयांना विकून छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित कातकरी समाजातील महिलेला मे २०२४ मध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी लग्नास भाग पाडण्यात आले. आरोपी व त्याच्या आईने दोन दलालांना पैसे देऊन मानवी तस्करी केल्याचा आरोप आहे. सासरकडून शारीरिक-मानसिक छळ व जातीय शिवीगाळ झाल्याचे तिने सांगितले. प्रसुतीनंतर महिला जून २०२५ मध्ये ती माहेरी परतली. ६ जानेवारी रोजी मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे.