Pune Rural : राजस्थानवरून सुट्टीसाठी आलेल्या १३ वर्षीय मुलाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू

वेल्हे: पानशेत (ता. वेल्हे) येथे सुट्टीसाठी आलेल्या १३ वर्षीय मुलाचा पानशेत धरणातील कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव सोहनलाल लखमाराम रायिका (वय १३) असून, तो मूळचा राजस्थानमधील पाली तहसील येथील रहिवासी आहे.
वेल्हे पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, सोहनलाल आपल्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी पानशेत येथे आला होता. दहा-पंधरा दिवसांपासून तो पुणे परिसरात होता. मंगळवारी (दि. ११ जून) दुपारी तो पानशेत धरण परिसरात आंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच हवेली आणि वेल्हे आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
शोध मोहिमेत पोलीस हवालदार युवराज सोमवंशी, मंडल अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांच्यासह गणेश सकपाळ, संजय चोरगे, निलेश जाधव, निलेश तारू, उत्तम पिसाळ, सनी माने, दिग्विजय ठाकर, किरण पवार, जगदीश आडे, रामेश्वर राठोड, सागर राठोड आदींनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
या दुर्दैवी घटनेमुळे पानशेत परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अतिथी म्हणून आलेल्या लहानग्याचा असा मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह गावकरीही दुःखी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वेल्हे पोलीस स्टेशन करत आहे.





