नवी दिल्ली – सोने आण चांदीचे दर सध्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आगेकूच करीत आहेत. इराण आणि इस्रायल दरम्यान तणाव निर्माण झाला असल्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असल्याचे वातावरण आहे. मात्र यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सोने खरेदी करता येत नसल्याचे दिसून येते.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 300 रुपयांनी वाढून 73,050 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. तयार चांदीचा दर पाचशे रुपयांनी वाढून 85,700 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,355 डॉलर आणि चांदीचा दर 28.25 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. एक तर अमेरिकेतील व्याजदर कपात लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मध्यपूर्वेत विविध देशादरम्यान निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत परवा इराणने इस्राईलवर बरीच क्षेपणास्त्रे डागली. त्याचबरोबर तांबड्या समुद्रातील हिंसाचाराचा जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती लवकर निवळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदी खरेदी करीत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
या अगोदर सोने आणि चांदीतील गुंतवणुकीबरोबर इतर क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अमेरिकेच्या व्याजदराकडे लक्ष देत होते. मात्र आता मध्यपूर्वेतील तणावाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. हा तणाव चिघळला तर जागतिक व्यापारावर परिणाम होईल.
अशा परिस्थितीमध्ये सोने आणि चांदीतील गुंतवणूक सुरक्षित राहील असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले. लवकरच अमेरिकेतील किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यावरून गुंतवणूकदारांना व्याज दरासंदर्भातील अंदाज येऊ शकेल अशी त्यांनी सांगितले.