शरद पवार यांच्या भाषणानंतर पंतप्रधान मोदींनी दिले पाणी

दिल्ली – राजधानी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत चालेल. आज दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बैठक व्यवस्था एकमेकांच्या बाजूला होती. यावेळी संमेलनात शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या ग्लासमध्ये बाॅटलमधील पाणी ओतून त्यांना पिण्यास दिले. सध्या या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदींच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले –
या सोहळ्यात उपस्थित राहिलेले शरद पवार म्हणाले, मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकावला आहे. दिल्ली मध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस दिसून येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद झाला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे रसिक, साहित्यिक या सर्वांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी मिळवून दिले. 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी याचे उद्घाटन केले होते. मी जेव्हा याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा मोदींनी एक मिनिट सुद्धा लावला नाही आणि महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे तर माझी उपस्थिती असणार आहे असे त्यांनी सांगून टाकले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला महिला अध्यक्ष लाभल्या याचा मला आनंद आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनोगत –
देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून आणि देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी साहित्यिकांना माझा नमस्कार, असे मोदी यांनी मराठीमध्ये म्हंटले. आज दिल्लीच्या धर्तीवर मराठी भाषेच्या या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषेपूर्ते मर्यादित नाही. संत तुकरमांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून नमन करते.
देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाचे शुभेच्छा देतो आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. यावेळी मोदींनी संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेवरील ओळी देखील म्हणून दाखवल्या. मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेवर माझे जे प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नेहमी मराठीमधील नवीन नवीन शब्दांना शिकण्याचा प्रयत्न करत असतो.
महाराष्ट्राच्या जमिनीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी पेरले गेले होते आज ते शताब्दी साजरी करत आहे. संस्कृती जपण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहे. आरएसएसने जगण्याची प्रेरणा दिली आहे आणि संघांमुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो आहे. देशात तसेच पूर्ण जगात 12 कोटीपेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम मला करता आले हे मी माझे सौभाग्य मानतो. भाषा केवळ संवादासाठी नाही तर संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजात जन्म घेते पण भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्त्वाची असते.





