प्रभात वृत्तसेवा पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून अखेर निवडणूक मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात ३५ लाख ५१ हजार ९५४ मतदारांसाठी ९१८ विविध ठिकाणी तब्बल ४ हजार ४ मतदान केंद्रे असणार आहेत.त्यात, शाळा, महाविद्यालये, सोसायट्या तसेच सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. पुणे महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार यादी अंतिम केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा मी निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया सुलभ व अडथळामुक्त राहावी, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ शौचालये तसेच मतदारांना मार्गदर्शन करणारे स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच, मतदान केंद्रांवर होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात मतदान अधिकारी व कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. शहराचा विस्तार, लोकसंख्येत झालेली वाढ, नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि बदललेली प्रभाग रचना यामुळे ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.